
रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ
रायगड – दिवेआगर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारी असलेले गाव आहे. हे गाव मुंबईपासून सुमारे १६० किमी आणि पुण्यापासून १७० किमी अंतरावर आहे. दिवेआगर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि येथील मुख्य आकर्षण म्हणजे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा.
दिवेआगर परिसर :
1. समुद्रकिनारा : दिवेआगरचा समुद्रकिनारा सोनेरी वाळू आणि नारळाच्या झाडांनी भरलेला आहे. येथे शांत आणि कमी गर्दी असल्याने हे आरामासाठी उत्तम ठिकाण आहे. दिवेआगर येथील समुद्र किनारी पर्यटकांसाठी विवीध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स सुविधा उपलब्ध आहेत.
2. सुवर्ण गणेश मंदिर : सुवर्ण गणेश मंदिर हे दिवेआगर गावातील एक प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाचे मंदिर आहे. हे मंदिर गणपतीच्या सुवर्ण मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे आणि कोकणातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मानले जाते. २०१२ साली, या सुवर्ण मूर्तीची चोरी झाली होती.चोरीनंतर मंदिरात आता गणपतीची दुसरी सुवर्ण मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. दिवेआगर येथे पर्यटक आणि भाविकांची गर्दी असते.
3. रुपनारायण मंदिर : हे प्राचीन मंदिर विष्णू भगवान यांना समर्पित आहे आणि कोकणी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. गाभाऱ्यात स्थित असलेली भगवान विष्णूची मुर्ती एका अखंड शिळेतून घडवली गेली आहे. या मूर्तीच्या प्रभवळीवर दोन्ही बाजूला दशावतार कोरलेले आहेत, जे या मंदिराचे वैशिष्ट्य असल्याचे मानले जाते. रुपनारायण मंदिराच्या अगदी समोरच एक सुंदर पाय विहीर आहे, जी पर्यटकांना आकर्षित करते. रुपनारायण मंदिराच्या शेजारी भगवान यांचे दूसरे रूप म्हणजे श्री सुंदर नारायणाचे मंदिर असुन भाविक येथे दर्शन घेतात.
4. भव्य दीपमाळा असलेले गौतमेश्वर मंदिर : गौतमेश्वर मंदिर हे दिवेआगर गावात स्थित आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि त्याला गौतमेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या परिसरात चारही बाजूला असंख्य दीपमाळा आहेत. दगडात बांधलेल्या या दीपमाळा त्रिपौरारी पौर्णिमेला हजारो दिव्यांचे प्रज्वलन यावर करण्यात येते. पेशव्यांचे कुलदैवत म्हणूनही हे मंदिर प्रसिद्ध आहे. भाविक आणि पर्यटक यांची या परिसरात कायम वर्दळ असते. या मंदिरात दर्शन घेण्यासाठीच पर्यटक येतात.
दिवेआगर परिसरात पाहण्यासारखी इतर पर्यटनस्थळे :- मुरुड जंजिरा किल्ला, दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर, श्रीवर्धन या जवळपासच्या गावांना देखील पर्यटक भेट देता शकतात.
