
दापोली येथील एक प्रमुख पर्यटनस्थळ
दापोली | कर्दे समुद्र किनारा , दापोली – बाणकोटचा खाडी ते दाभोळ असा अंदाजे तेरा किलोमीटरची सागरी किनारापट्टी लाभलेल्या दापोली तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत.
मुंबई पासून दोनशे सत्तावीस किलोमीटर तसेच पुणे येथून पावणे तीनशे किलोमीटर अंतरावर दापोली शहर वसलेलं आहे.
याआधी या दापोलीची ओळख नररत्नांची भूमी आणि कोकण कृषी विद्यापीठ एवढय़ापुरतीच मर्यादित होती, मात्र आता पर्यटकांचे प्रथम पसंतीचे डेस्टिनेशन म्हणून दापोली नावारूपास येत आहे.
मिनी महाबळेश्वर म्हणून थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या दापोली परिसरात दोन/तीन दिवस मुक्काम करून आपण जवळपास साठ किलोमीटर परिसरातील निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक पर्यटनठिकाणे बघू शकतो.
दापोली शहरापासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेले अतिशय विस्तीर्ण असा “कर्दे” येथील सागरतीर . – दापोली – आसूद मार्गे मुरुडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून मुरुड गावाच्या आधी येणाऱ्या वळणावर डावीकडे वळून आपण सुरक्षित, निसर्गरम्य आणि चंदेरी वाळूमुळे प्रसिद्ध असलेल्या कर्दे येथील सागरकिनारी आपण पोहचू शकतो . शांत , निवांत अश्या या सागरतीरी, सागराची गाज ऐकायची मजा काय वर्णावी.
या ठिकाणी एसी/नॉन एसी निवास तसेच पोटाची क्षुधा शमविण्यासाठी सोलकढी, माशांचे विविध प्रकार, तांदळाची गरम भाकरी असे अस्सल कोकणी खाद्यपदार्थ पुरविणारी उपहारगृहे किनार्यावर आपली जणू वाट बघत असतात.
खोल समुद्रात डॉल्फिन मासे पाहण्यासाठी सागरी सफर येथे करता येऊ शकते . मात्र जाणकारांकडून माहिती घेऊनचं भर समुद्रात जाणे इष्ट.
निवांतपणे दोन दिवस तरी आपल्या परिवारासह मुक्काम ठोकावा असे हे ठिकाण नक्कीच आहे . सागर किनाऱ्याजवळून नारळ पोफळीच्या गर्दीतून कर्दे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यात अधूनमधून डोकावणारी कौलारू घरं आम्ही आपल्यापर्यंत ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून पोहचवत आहोत (व्हीडिओ link लवकरच) . आपला अभिप्राय जरूर नोंदवावा धन्यवाद ……
