
देवीला केलेला नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे……
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी आश्रय घेतल्याची नोंद
यवतमाळ : विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवरील यवतमाळ जिल्ह्यातील जगदंबा देवी मंदिर एक स्वयंभू देवस्थान म्हणून ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर गावात हे मंदिर आहे. खुनी नदीच्या काठावर गडद वनराईत हे हेमाडपंती मंदिर आहे. पुराणात या देवीचा उल्लेख कुंतरपूरची देवी असाही आहे. जेमिनी अश्वमेध ग्रंथात कुंतलापूरची भवानी आणि राजा चंद्रहास यांची कहाणी आहे. राजा चंद्रहास यांचे हे राज्य होते. त्यांच्यावर प्रसन्न होत देवी येथे प्रकट झाली अन् कायमचे वास्तव्य केले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
१८१८ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी केळापुरात आश्रय घेतल्याची नोंद बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात आहे. केळापूर ही गोंड राजाची राजधानी असल्याचा उल्लेखही इतिहासात आहे.
देवगिरीचा राजा रामदेवराय यांच्या दरबारात हेमाद्रीपंत नावाचा प्रधान होता. तो वास्तुशिल्पज्ञ होता. त्याच्याच काळात हेमाडपंती मंदिराच्या निर्मितीला सुरुवात झाली. या पुराव्यानुसार १४ व्या शतकात हे मंदिर निर्माण झाले असावे, असा अंदाज आहे, पण प्राचीन नोंदीचा आधारे हे मंदिर पांडवकालीन असल्याचेही सांगितले जाते.
मंदिराच्या गाभाऱ्यात आई जगदंबेची देखणी मूर्ती आहे. या चतुर्भुज देवीच्या मांडीखाली राक्षसही आहे. २ बाणही याठिकाणी दिसतात. या देवीला केलेला नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच आंध्र आणि तेलंगणातील भाविक मोठ्या संख्येने याठिकाणी येतात. नवरात्रीत भाविक अनवाणी पायी चालत येतात. तसेच मंदिरात अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित केली जाते.
पांढरकवळा गावातील तरुणांनी एकत्र येत १९८१ मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. १९८७ मध्ये मंदिर पूर्ण केले. यासाठी लोकवर्गणीतून ४ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. १९८८ मध्ये मंदिराचे विश्वस्त मंडळ स्थापन झाले आहे. याठिकाणी नवरात्रीत धार्मिक कार्यक्रमांसोबतच पारंपरिक लोककलांचा जागरही होतो. राजा चंद्रहासाचा इतिहास या मंदिरात गोंधळ सादर करणारेही सांगतात. तसेच पोवाड्यांतूनही या राजाचा इतिहास सांगितला जातो.
हल्लीचे देवीचे मुख आणि मुकुट चांदीमध्ये केल्याचे दिसते. या मंदिराचा परिसर अतिशय रम्य आहे. याठिकाणी भाविकांना अभूतपूर्व शांतीची अनुभूती होते.
कसे जाल : यवतमाळ येथून रस्ते मार्गाने पांढरकवडा येथुन ४ किमी अंतरावर केळापूर गाव आहे…… स्त्रोत : सोशल मिडिया
