
अग्निपुराणात वर्णन केलेल्या एकमुखी मूर्तीप्रमाणे येथील मूर्ती देखील एकमुखी आहे.
Mahaparyatan ।। श्रीराम समर्थ ।। श्री गोंदवलेकर महाराजांनी शके १८३३ म्हणजे इ.स.१९११ साली १७ मे वैशाख शुद्ध पंचमी या शुभदिवशी श्री दत्तमूर्तीची स्थापना केली.
अग्निपुराणात वर्णन केलेल्या एकमुखी मूर्तीप्रमाणे ही मूर्तीदेखील एकमुखी आहे. तिला शंख, चक्र, डमरु, त्रिशुल, माला व कमंडलू धारण केलेले सहा हात आहेत. मूर्ती अतिशय रेखीव, सुंदर आणि प्रसन्न आहे.
श्री दत्तमूर्तीच्या डाव्या बाजूस श्री महाराजांचा कफनीमधील फोटो आहे त्याचे वैशिष्ट्य असे की हा फोटो १९०२ मध्ये महाराजांना समोर बसवून कलाकाराने काढला आहे.
दर वर्षी चैत्र महिन्यात दोन्ही राम मंदिरात चैत्रागौरीचे हळदी-कुंकू होत असे. तसे या मंदिरातही हळदी-कुंकू व्हावे अशी पुजाऱ्यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर श्री महाराजांनी देवीची मूर्ती आणली ती कोनाड्यात ठेवली होती नंतर पुढे इ.स. १९५९ साली श्री तात्यासाहेब केतकर (वाणी अवतारात) यांच्या हस्ते श्री देवीच्या मूर्तीची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली. त्यावेळी शतचंडी महायाग करण्यात आला होता.
श्री महाराजांनी मंदिराच्या मागील बाजूस देऊळवजा कोनाड्यात श्री नरसिंह मूर्ती आणून ठेवली होती ८ आक्टोबर १९९२ रोजी तिची स्थापना केली गेली. इ.स. १९९२ मध्ये ४,५,६ डिसेंबर या दिवशी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला मध्यभागी दत्तमूर्ती तिच्या दक्षिण बाजूस श्री नरसिंह मूर्ती व उत्तर बाजूस देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
या मंदिरात श्री दत्त जयंती, चैत्रागौरीचे हळदी-कुंकू आणि श्री नरसिंह जयंती मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.श्री महाराजांनी इ.स.१९१२ साली श्री शनिदेवाच्या मूर्तीची स्थापना केली. वैशाख अमावस्येला येणाऱ्या शनैश्वर जयंतीला भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.

