
महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हदगाव | पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच येथे केले.
नांदेड जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व व कलशारोहण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. मराठवाडा, विदर्भ व महाराष्ट्रातील ठीक ठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते.
वैराग्यमूर्ती मठाधिपती महंत श्री योगी बापू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर माहूर पिठाधीश कवीश्वराचार्य माहुरकर बाबा यांच्यासह परिसरातील मठाधिपती धर्मपीठावर विराजमान होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या या मठाधिपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महानुभाव पंथीयांसाठी केलेल्या कार्यकर्तृत्वाला लक्षात घेऊन स्तुती सुमनांनी साकारलेले सन्मानपत्र बहाल केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्वप्रथम चक्रधर स्वामींना दंडवत घातला. त्यानंतर धर्मपीठावरून बोलताना सर्वज्ञ चक्रधर स्वामी व त्यांच्या अनुयायांनी अतिशय विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचे कार्य केल्याचे स्मरण केले. महानुभव पंथीयांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी गौरव केला. परकीय आक्रमणामुळे कृष्णदेवाची पूजा करून घेणे, हिंदू म्हणवून घेणे कठीण होते. त्या काळात चक्रधर स्वामीनी जातीपाती, पंथाचा विचार न करता महानुभव दाखवला, समरसता व समतायुक्त समाज त्याकाळी देशात निर्माण केला.
महाराष्ट्र शासनाने राज्यभरात आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथीयांचे मंदिर आहेत त्या मंदिरांचा विकास करण्याचे काम केल्याचे सांगितले. रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंदप्रभू देवस्थान अशा अनेक ठिकाणी संवर्धनाचे काम सुरु आहे, यापुढेही हे कार्य सुरू राहील,असे आश्वस्त केले.तसेच या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून येथील विकास कामे केली जातील. चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभे राहील, असे सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

