
मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव
अंबरनाथचे शिवमंदिर हे महाराष्ट्रातील भूमिज शैलीतील सर्वात प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राजघराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर उभारल्याचा उल्लेख शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे.
हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा अद्भुत आणि अप्रतिम नमुना आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराजाने इ. स. १०२२ मध्ये शिवालय उभारण्यास प्रारंभ केला. इ. स. १०६० मध्ये त्याचा धाकटा भाऊ माम्वाणीने बांधकाम पूर्ण केले.
हे शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराळ, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. या ठिकाणाचे मूळ नाव ‘आम्रनाथ’ असे होते, त्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले. मंदिरावर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव दिसतो.
काही अभ्यासकांच्या मते, जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली ही वास्तू भूमिज आहे. हे एकच भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते. देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. गाभारा आणि सभामंडप, असे दोन भागांत विभागलेले हे मंदिर आहे. गाभारा सभामंडपापेक्षा थोड्या खोलगट जागी आहे.
मंदिरावर गरुडासन विष्णु, मंदिराची निर्मिती करणारा स्थपती, कपालधारी शिव, विवाहापूर्वीची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती, चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गणेश नृत्यमूर्ती कुशलतेने कोरलेली आहे. कसे जाल : रेल्वे आणि रस्ते मार्गाने जाता येईल.
