
|| श्री दुर्गादेवीची गंडकी शिळेतील अष्टभूजा मुर्ती ।।
प्राथमिक माहिती – प्रमाणे बाराव्या शतकात जालंदर नावाचा राजा होऊन गेला. जालंदर राजा दापोली पासून सुमारे ४ कि. मी. अंतर असलेल्या जालगांवात राज्य करीत होता. गंगाधर, दिवाकर व पद्माकर भट या तीन ब्राह्मणांना त्याने मुरुड, गुहागर व दिवेआगर येथील जहागिऱ्या दिल्या. या तीनही ठिकाणच्या मूर्ती कर्नाटकातून आणलेल्या असून मूर्ती गंडकी शिळेच्या व अष्टभूजा आहेत. मुरुड गावावर अनेक आपत्ती आल्या व मंदिराचे अतोनात नुकसान झाले. हल्लीचे देऊळ सन १७६३ मध्ये बांधले.
पुर्वीच्या काळी गावाच्या इतिहासाची नोंद करुन ठेवण्यासाठी ‘बखरी’ लिहित असत. परंतू आश्यर्याची बाब म्हणजे मुरुड गावचा इतिहास दोन वेगवेगळ्या वखरीमध्ये नोंदवून ठेवण्यात आला आहे. दोन बखरी असल्यामुळे दोन मत्त प्रवाह आहेत. सदर बखरींचा समावेश कै. अण्णासाहेब कर्वे यांचे चरित्र व दातार कुलवृतान्त यात करणेत आला आहे. दोन्ही बखरींमध्ये नमूद करणेत आलेला मंदिर निर्मितीचा कालावधी सन १००० ते सन १४०० दरम्यानचा आहे.
पहिली बखर : सिद्ध पुरुष नागर ब्राह्मण फरिस्ता नांदिवडे गावी आला. त्याने दातार ब्राह्मण यांचे घरी वास्तव्य केले. दातार ब्राह्मणास तीन मुले व एक विधवा कन्या होती. त्या सर्व मुलांना ब्राह्मणाने शाबरी विद्या शिकविली. त्यानंतर सर्व जालंदर राजाकडे गेले. राजाने त्यांची विद्वत्ता पाहून मुरुड गाव बसविण्यासाठी जागा दिली.
दुसरी बखर : तिघे ब्राह्मण नागर देशावरुन देश पहात दक्षिणेस आले. प्रथम दिवे आगर येथे दिवाकर भट राहीला व गंगाधर आणि पद्माकर भट दापोली जवळच्या आसूद या गावी आले. आसूद येथे वास्तव्य करुन मुरुडची वसाहत करण्याचे काम सुरु केले. वसाहतीसाठी त्यांनी एक मोठे वडाचे झाड तोडले, वडाच्या झाडावर वास्तव्य असलेल्या भूताने चिडून दातार ब्राह्मणास ठार मारिले. गंगाधर व पद्माकर भट यांनी दातार ब्राह्मणास परत जिवंत केले व भूताचा कायमचा बंदोबस्त केला. नंतर कर्नाटकात जावून तीन मुर्ती आणल्या व त्यांची स्थापना केली.
श्री दुर्गादेवीचा उत्सवःचैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत श्री दुर्गादेवीचा उत्सव केला जातो. रामनवमीला रथोत्सव असतो. या उत्सवासाठी सोनारांना खास मान दिलेला आहे. श्री मुरुडकर सोनार यांचे पूर्वीचे नाव भानू होते असा उल्लेख आलेला असल्यामुळे गानू व भानू एक नाहीत असा निष्कर्ष निघू शकतो.
पुर्वीच्या काळी चैत्र शुद्ध सप्तमीला देवीची मुर्ती सोनार वाड्यात नेत असत. अष्टमीला सोनार वाड्यात पूजा करुन श्री. बाबूशेट मुरुडकर यांचेकडे पॉलिश करण्याची प्रथा होती. रात्री पालखी देवळात परत येत असे. सध्या ही प्रथा बंद झाली असून देवीची मुर्ती न नेता प्रतिकृती नेली जाते. बखरींमध्ये पालखी बावतचे ही नियोजन केल्याचे दिसून येते. देवीच्या रथाला चार भोई व चार खांब असावेत, पुढील उजवी बाजू ब्राह्मणांनी डावी बाजू सोनार तर मागील उजवी बाजू मराठा व मागील डावी बाजू कुणबी य इतर समाजातील लोकांनी धरावी असा उल्लेख आहे.
मंदीराचे काम सन १७६३ मध्ये झाले असून सन १९९० मध्ये गाभाऱ्यात फरशी बसविण्यात आली. त्यानंतर सन २००८ मध्ये सभामंडपाची निर्मिती झाली…. साभार – श्री. विनय रामचंद्र गानू अध्यक्ष, गानू कुलसम्मेलन समिती
