श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर, गणेशगुळे

गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले अशी आख्यायिका
गणेशगुळे समुद्र किनारा : गणेशगुळे गावाला सुमारे दोन कि. मी. लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. किनाऱ्यावर माड आणि सुरुचे बन असून थोडासा निर्मनुष्य असलेला किनारा शांत आणि स्वच्छ आहे.
गणेशगुळे गावाच्या अगोदर एक फाटाफुटतो. डावीकडे वळून गणेशगुळ्याच्या समुद्रकिनारी तर उजव्या बाजूस वळल्यास थेट मंदिर परिसर लागतो. हे मंदिर टेकडीवर असून पायी अथवा वाहनाने थेट मंदिरापर्यंत जाता येते.
येथे कसे जायचे : रत्नागिरी (Ratnagiri) – राजापूर (Rajapur) या महामार्गावर पूर्णगडकडे जाताना, रत्नागिरीपासून २२ किलोमीटर तर पावस (Pawas) गावापासून सहा किलोमीटर अंतरावर समुद्र किनारी असलेले निसर्गरम्य गाव म्हणजे गणेशगुळे.
पूर्वेला डोंगररांगा आणि पश्चिमेला अथांग अरबी समुद्र.. हिरवीगार वनसंपदा लाभलेला सुंदर परिसर. आंबा (Mango), काजू (Cahewnuts) , नारळी-पोफळीच्या (Coconut) बागांनी वेढलेला. अशा सुंदर परिसरात पूर्वेला असलेल्या टेकडीच्या माथ्यावर श्री गणेशाचं स्वयंभू स्थान आहे.
मंदिर रचना आणि परिसर : रस्त्याच्या उजव्या हाताला मंदिराची दोन शिखरे दिसून येतात. उंचावर असलेल्या मंदिराच्या समोरच्या भागात खोल दरी आणि हिरव्यागार वनसंपदेने नटलेले सौंदर्य नजरेत भरते.
डोंगरउताराच्या बाजूने एका विस्तीर्ण चौथऱ्यावर दक्षिणाभिमुखी असलेले हे गणेशस्थान वसलेले आहे. काही पायऱ्या उतरून मंदिर परिसरात जाता येते. पायऱ्या उतरल्यावर उजव्या बाजूस मंदिर संस्थांचे कार्यालय आहे. मुख्य मंदिराच्या डाव्या हाताला पत्रे घातलेले खूप मोठे सभागृह असून गाभाऱ्यासमोर बैठक व्यवस्था असलेले छोटे सभागृह आहे. गाभाऱ्यासमोर एक तुळशीवृंदावन आणि हातात लाडू घेतलेल्या उंदराची पितळी मूर्ती आहे. सभागृह आणि गाभारा या दोन्हींवर कळस बांधलेले आहेत.
१९७० साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला याची नोंद असलेला फलक दर्शनीय भागात लावलेली आहे. मंदिरबांधणी जांभ्या दगडाची असून सद्यस्थितीत त्यावर रंगरंगोटी केलेली आहे.
स्वयंभू गणेश शिळा : या मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीगणेशाची मूर्ती नसून मध्यभागी असलेल्या ६ फूट उंचीच्या भल्यामोठ्या शिळेस स्वयंभू गणपती असल्याचे मानले जाते. फार पूर्वी गणपतीच्या नाभीतून अर्थात या स्वयंभू शिळेमधून पाण्याची संततधार वाहत असे. काही नैसर्गिक कारणांनी एके दिवशी हे पाणी अचानक बंद झाले. तेव्हापासून देवाने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले अशी आख्यायिका प्रचलित झाली.
दंतकथा : समुद्रमार्गे व्यापार करणारे अनेक व्यापारी, कोळी या ठिकाणी व्यापार वाढीस जावा तसेच समुद्रमार्गे होणारा गलबतांचा प्रवास सुरळीत व्हावा, म्हणून गणपतीला साकडं घालायचे. केलेला नवस पूर्णही व्हायचा, तेव्हापासूनच हा देव ‘गलबतवाल्यांचा गणपती’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
मंदिर निर्मितीबाबत आख्यायिका : या मंदिरच्या निर्मिती बाबत एक आख्यायिका अशी सांगितली जाते फार पूर्वी ‘गणेशगुळे’ हे गाव ‘आगरमुळे’ या नावानं ओळखलं जात असे.
अंदाजे चारशे वर्षापूर्वी पावस येथील ग्रामस्थ वेदशास्त्रसंपन्न रामचंद्रपंत चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण पोटशुळाच्या आजाराने त्रस्त होते. आजार विकोपाला गेल्याने तसेच वेदना असह्य झाल्यामुळे त्यांनी त्या वेळेच्या आगरगुळे गावाजवळील समुद्रात देहत्याग करण्याचा निश्चय केला. ते समुद्राच्या दिशेनं चालत जात असतानाच, वाटेत त्यांच्या वेदना इतक्या असह्य झाल्या की, पुढचे पाऊल देखील टाकवेना.
वाटेतच ते एके ठिकाणी झुडपात तसेच मरणासन्न अवस्थेत पडून राहिले. गणेशभक्त असल्याने त्यांनी तेथेच श्री गणेशाच्या अनुष्ठानास आणि नामस्मरणाला प्रारंभ केला. एकवीस दिवसांनंतर त्यांना दृष्टान्त झाला. आणि काय आश्चर्य अल्पावधीतच ते व्याधीमुक्तही झाले.
चिपळूणक गुरुजींना झालेला साक्षात्कार आणि त्यांचा पोटशुळाचा आजार बरा झाल्याचे गावात समजल्यानंतर अनेकांनी या गणेशाचे दर्शन घेतलं.
श्री गणेशासमोर बोललेल्या इच्छा पूर्ण होत असल्याने, हा गणपती ‘इच्छापूर्ती गणेश’ म्हणूनही ओळखला जातो. तेव्हापासून मूळचे आगरगुळे (Agargule) नाव असलेल्या या गावात स्वयंभू गणेश अवतारल्यामुळे ‘गणेशगुळे’ (Ganeshgule) म्हणून पुढे रूढ झाले.
निवास/भोजन व्यवस्था : गणपतीपुळे प्रमाणे या मंदिराला फारशी प्रसिद्धी प्राप्त झालेली नसली तरी मराठवाडा, विदर्भ, गोवा, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक गणेशभक्त गणेशगुळेतील श्री गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात.
मंदिराची स्वतःचे असे भक्तनिवास नाही. मात्र या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन गावात समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स मध्ये उत्तम व्यवस्था ठेवली जाते. काही ग्रामस्थांकडून घरगुती निवास भोजनाची व्यवस्था करण्यात येते. येथून रत्नगिरी शहर फक्त बावीस किलोमीटर अंतरावर असून तेथे आपल्या बजेटनुसार निवास/भोजनाची सोय होऊ शकते. आपणही रत्नागिरीला गेल्यावर येथे दर्शनासाठी जरूर जरूर जा.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन

Comments 1