
श्री दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिर, हेदवी, तालुका गुहागर , जिल्हा रत्नागिरी
अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेल्या कोकणभूमीत गणेशाची अनेक जागृत देवस्थाने आढळून येतात त्यातीलच एक स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर.
श्री लक्ष्मीगणेश देवस्थानाचा हा व्हिडीओ नक्की बघा
येथे कसे जाल
निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातले हेदवी हे गाव मुंबई पासून दोनशे नव्वद किलोमीटर तर पुण्यापासून दोनशे बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. गुहागरकडून येतांना हेदवी गावात शिरल्यावर डाव्या हाताला किल्लेवजा दगडी तटबंदीने वेढलेले उंच टेकडीवर वसलेले श्री गणेशाचे मंदिर आपल्या नजरेस पडते. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या असून थेट मंदिरापर्यंत गाडी रस्ताही तयार करण्यात आला आहे. मंदिर परिसरासमोरच वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
गर्द आमराई, शांत आणि मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळ-फुलांच्या बागा यामुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या प्रेमात न पडला तर नवलच. गुहागर गावापासून अंदाजे 17 किमी अंतरावर असलेले हेदवी गाव प्रसिद्धीस आलं ते इथे असलेल्या दहा हातांची म्हणजेच दशभूज गणेशच्या सुबक आणि दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती असलेल्या देवस्थानामुळे. नवसाला पावणार्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांमुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो.

दशभुज गणेशाचे हेदवी गावात आगमन कसे झाले त्याबद्दल आख्यायिका , श्री लक्ष्मीगणेश मूर्ती वैशिष्ठ्य
पेशवेकाळात केळकर स्वामी नावाच्या गणेशभक्ताला श्रीमंत पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी दिलेल्या निधीतून केळकर स्वामींनी येथे हे मंदिर उभारले. मंदिरातील ही पूर्वाभिमुख मूर्ती काश्मीर येथील पांढर्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजूला पहिल्या हातात चक्र, दुसर्या हातात त्रिशुळ, तिसर्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग आहे. डाव्या बाजूच्या पहिल्या हातात कमळ, दुसर्या हातात पाश, तिसर्या हातात नीलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. गणेश मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक असलेली सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. एका मोठ्या आसनावर विराजमान असलेल्या या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे.

श्री लक्ष्मीगणेश मूर्ती वैशिष्ठ्य
मूर्तीचे काळेभोर डोळे अत्यंत बोलके आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतल्यास श्री गणेश आपल्याकडेच पाहात आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी ही दशभुज लक्ष्मीगणेश मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे असं म्हणावं लागेल. मंदिराच्या उजव्या कोनाड्यात असलेली लक्ष्मी विष्णुची मूर्ती ही विशेष रूपातली आहे. मूर्तीच्या बाजूला जय-विजय असून मूर्ती गरुडारूढ आहे. टप्याटप्याने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद आणि माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. संकष्टी अंगारिका आणि विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अशा या निसर्गरम्य हेदवी गावास स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. आपल्याला पर्यटन आणि तिर्थाटन या दोन्हीचा लाभ येथे घेता येतो.

हेदवी येथील समुद्र किनारा
अशा या हेदवी गावात श्री दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिराव्यतिरिक्त समुद्र किनारी असलेल्या उमा महेश्वराच्या मंदिराला पर्यटक आवर्जून भेट देतात. उमा महेश्वर मंदिरापासून खडकाळ समुद्र किनाऱ्यावरून पुढे चालत पुढे गेल्यावर थोड्याच अंतरावर निसर्गाचा अद्भुत चमत्कार समजला जाणारे निसर्गनिर्मित स्थान म्हणजे बामण घळ. समुद्रकिनार्यावर काळ्या कातळातील अंदाजे वीस मीटर लांब भेगेमधून ऐन भरतीचा वेळी उंच तुषार उडवत उसळणारा जलस्तंभ ही ठिकाणंहि पाहण्यासारखी आहे .

हेदवी गावात भोजन आणि निवास व्यवस्था
हेदवी गावात निवासासाठी भक्तनिवास अथवा खाजगी हॉटेल्समध्ये चांगल्या प्रकारे सोय होऊ शकते. गावात काही ठिकाणी घरगुती स्वरूपात शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था देखील केली जाते. धार्मिक विधी, अभिषेक देणगी देण्यासाठी थेट मंदिर व्यवस्थापन समितीशी संपर्क साधावा……

MAHAPARYATAN.COM
आमच्या युट्युब , फेसबुक , इंस्टाग्राम , ट्विटर पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका




Excellent place for tourism.underestimated serene beauty .Mesmerizing scenarios.