सोलापूर | तालुक्यातील माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. ते केव्हाबांधले गेले, याचा उल्लेख सापडत नाही, मात्र हे मंदीर साडेतीनशे वर्षां पूर्वीचे असल्याचं सांगितले जाते. माचनूर गावात प्रवेश केल्यावर काळ्या पाषाणात बांधलेला प्रथम सिद्धेश्वर मंदिर समूह लागतो. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवळ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी आहेत. मंदिरात ३ फुटी नंदी, शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी २ द्वारे आहेत. त्यातील पहिले दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे. यातून बसूनच गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो.
मंदिराच्या मागील बाजूस अहिल्यादेवी होळकर यांनी नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे. नदीपात्रामध्ये जटाशंकराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती आहे. सोलापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे.
श्रावणात येथे महिनाभर भाविकांची रेलचेल सुरू असते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येतात. औरंगजेब बादशहाचेही बरेच महत्त्वाचे कामकाज माचनूर येथून चालायचे. माचनूरचा किल्ला तसेच शेजारच्या बेगमपूर गावातला जुना किल्लाही – प्रसिद्ध आहे. येथे प्राचीन काळी ऋषिमुनी तपस्येला बसत. मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस बाबा महाराज आर्वीकर यांचा मठ आहे. मठालगत औरंगजेब बादशहाचा किल्ला आहे. [४] बादशहाने ११ रुद्राभिषेक श्रावण महिन्यामधे सुरू केले. या महिन्यामध्ये पूजा अर्चासाठी औरंगजेब कालावधीन अर्थसाहाय्य मिळते. बादशहाने चार वर्षे या छावणीत राहून दिल्लीचा कारभार पाहिला. या स्थळी शंकराचार्य, स्वामी समर्थ, सीताराम महाराज, बाबा महाराज आर्वीकर आदी संत येथे येऊन गेले आहेत. मंदिराच्या पूजेसाठी नगारा वाजवण्याचा मान माचनूर येथील मुस्लिम समाजाकडे आहे. पूजा अर्चाकरण्याचा मान ब्रह्मपुरीतील गुरव समाजाकडे आहे. कसे जाल : सोलापूर- मंगळवेढा महामार्गावर सोलापूरपासून ४० किमी व पंढरपूरपासून २६ किमी अंतरावर आहे, तर मंगळवेढ्यापासून १४ किमी अंतरावर आहे. खासगी वाहनाने येथे जाता येते.
