शिवपूर्वकालीन भगवान महादेवाचे मंदिर
महाड तालुक्याचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज (Shri Vireshwar Maharaj) यांचे मंदिर महाडच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. महापर्यटन (MahaParyatan.com) टीम ज्या वेळी श्री विरेश्वर मंदिरात चित्रीकरणासाठी गेली होती तेव्हा स्थानिक रहिवासी आणि इतिहास अभ्यासक श्री. प्रभाकर भुस्कुटे यांच्याशी भेटीचा योग आला. त्यांच्याकडून आम्हाला त्याच्याकडून या मंदिराविषयी आणि महाड गावाविषयी विस्तृत माहिती मिळाली.
श्री देव विरेश्वर महाराज यांचे हे मंदिर अतिशय पुरातन हेमाडपंथी (Hemadpanthi) आहे. हे मंदिर शिवपूर्व काळातले असल्याचे मानले जाते. एका सुंदर तळ्याकाठी हे मंदिर आहे. देवाच्या नित्यपूजा आणि अभिषेक यासाठी तलावाचे पाणी पूर्वी वापरात असत. हा तलाव मानव निर्मित असून तलावाच्या खोदकामात निघालेल्या दगडांचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले आहे.

मंदिर रचना
भव्य सभागृह, अंतर्गृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. सभागृहात उत्सव काळात कीर्तन होत असते.
छत्रपती शिवाजी महाराज अनेक वेळा या मंदिरात येऊन गेले असल्याचे इतिहासात दाखले मिळतात. रामचंद्र हर्डीकर यांनी लिहिलेल्या ग्रंथात छत्रपती महाराज आणि माँ साहेब जिजाऊ यांनी येथे कीर्तनाचा लाभ घेतला असल्याचा उल्लेख आढळून येतो.

सभागृहात नंदीची मूर्ती आहे. आराध्यदैवत भगवान शंकरांकडे टक लावून बसलेल्या नंदीच्या शिल्पावर गळ्यात घंटा, अंगावर घुंगुरमाळ, झूल असे कोरीवकाम आहे. प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे आणि त्यानंतर भगवान शंकरांचे दर्शन घ्यावे अशी प्राचीन परंपरा आहे.
श्री देव विरेश्वर हे एक स्वयंभू जागृत देवस्थान असून नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. इच्छित कार्यसिद्धी होण्यासाठी भाविक दहिभाताचे लेपनाचा नवस बोलतात.
अंतर्गृहाचे प्रवेशद्वार दगडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या वर असंख्य देवदेवतांची पुरातन शिल्पं दिसून येतात.
आत गेल्यावर समोरच असलेल्या गाभाऱ्यात प्रवेश करता येतो. गाभाऱ्यात चांदीचा नागफणा असलेली भव्य शिवपिंडी (Shiv Pindi) आहे. पिंडीमागे एका कोनाड्यात श्री दुर्गादेवीची (Durgadevi) छोटी मूर्ती आहे.
नित्यपूजा, अभिषेक यासाठी पुजाऱ्यांची देवस्थान कमिटीच्या वतीने नेमणूक करण्यात आली आहे.
वार्षिक सण / उत्सव :
महाशिवरात्री : दरवर्षी महाशिवरात्री (Mahashivratri) हा या मंदिराचा प्रमुख उत्सव असून एकादशीपासून सात दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान विरेश्वराची महापूजा बांधून नैवैद्य अर्पिला जातो.
बिजेचा छबिना : फाल्गुन शुद्ध द्वितीयेस श्री विरेश्वर महाराजांचा बिजेचा छबिना (Bijecha Chabina) उत्सव साजरा होतो. रात्री गावातील सर्व देवांच्या पालख्या या ठिकाणी येतात. सर्व पालख्यांची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजतगाजत काढली जाते. हा कार्यक्रम रात्रभर सुरू असतो. सकाळी पालख्या विरेश्वराच्या मंदिरात परत आल्यावर लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची समाप्ती होते.
कुलदैवत (Kuldaivat)
चित्पावन (Chitpavan) ब्राह्मणांपैकी जोगळेकर (Joglekar) घराणे श्री देव विरेश्वर यांस आपला कुलस्वामी मानतात. वर्षभर या देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
महाड येथे कसे जायचे
महाराष्ट्राच्या कोकण (Kokan) विभाग रायगड (Raigad) जिल्ह्यातील एक निसर्गरम्य शहर म्हणजे महाड (Mahad). मुंबईपासून १६४ किलोमीटर अंतरावर आणि पुण्याहून १२८ किलोमीटर अंतरावर (Google map नुसार) असलेले महाड हे सह्याद्री पर्वताच्या रांगांनी घेरलेले असून सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले शहर आहे. कोकण रेल्वेने आल्यास वीर स्टेशन येथे उतरून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या महाड येथे जाता येते.
निवास / भोजन व्यवस्था
देवस्थानचे स्वतःचे भक्त निवास नाही. महाड येथे अनेक हॉटेल्स, निवासगृहे आणि भोजनालये असल्याने आपल्या बजेटनुसार राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय येथे होऊ शकते.
महाडजवळील पर्यटन आणि धार्मिक स्थळे
महाडपासून जवळच असलेले शिवथर घळ (Shivthar Ghal), किल्ले रायगड (Raigad Fort), पाल येथील प्रसिद्ध पांडव लेणी (Pandav Caves), गरम पाण्याचे झरे यासह अनेक ठिकाणे बघण्यासारखी आहेत.



Thanks a lot for detailed. We would like to sure visit such great places.
Thanks a lot for good detailed information. We would like to sure visit such great places.