
महाराष्ट्रतील संस्कृती व इतिहासाला जपण्याचा प्रयत्न
मुंबई | राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे.
महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हा महाराष्ट्राच्या विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
जागतिक वारसा नामांकनासाठी पंढरपूर वारी, कोकणातील कातळशिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे प्रस्तावही पाठविण्याचा तसेच रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचा घेतलेला निर्णयही महत्त्वाचा आणि आपल्या संस्कृती व इतिहासाला जपण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी २० हजार रूपये, “निर्मल वारी” साठी निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू – आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार करण्याची केलेली घोषणा म्हणजे आमची वारकरी संप्रदायाप्रती भक्तिभावाचे उदाहरण आहे, त्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


