भ्रमंती करत असताना महापर्यटनची टीम सातारा जिल्ह्यात पोहोचली. या वेळी स्थानिक रहिवासी आणि इतिहास अभ्यासक श्री विजय वैद्य सर यांच्याशी ओळख झाली. वयाची सत्तरी पार केलेल्या वैद्य काकांबरोबर पर्यटनाविषयी चर्चा करताना आम्हालाही जणू रिफ्रेश झाल्यासारखे वाटले.
सातारा जिल्ह्यातील गड किल्ले, पुरातन धार्मिक स्थळे, निसर्गाने नटलेली स्थळे पर्यटन स्थळांची इत्यंभूत माहिती असलेल्या सरांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की, मी तुमच्याबरोबर साताऱ्यातील पर्यटन स्थळांच्या चित्रीकरणासाठी यायला तयार आहे. त्या वेळी काकांचा उत्साह बघून आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.
त्यांच्या बरोबर केलेल्या भ्रमंतीमधे एका दिवसात आम्ही सातारा शहरापासून जवळच असलेल्या चार ठिकाणांचे चित्रीकरण पूर्ण केले. यामधे नागेवाडी गावातील स्वयंभू अष्टभुजा शाकंभरी देवीचे पुरातन मंदिर, श्री कोटेश्वर – लिंब गोवे गावातील भगवान शंकराचे पुरातन मंदिर, लिंब गावातील वैशिष्ट्यपूर्ण असलेली बारा मोटेची विहीर आणि धावडशी येथील ब्रह्मेंद्र स्वामींनी बांधलेले श्री भार्गवराम देवस्थान ही स्थळे पाहण्याचा योग आला.
