
समुद्रकिनारी निसर्गरम्य गावातील दुर्गादेवी मंदिर मुरुड
दापोली म्हटले समुद्रकिनारे, घाटरस्ते, निसर्गाच्या कुशीत वसलेली प्राचीन देवस्थाने असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या दापोलीपासून 10/11 किमी अंतरावर असलेल्या समुद्र किनाऱ्यावर मुरुड हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. अतिशय सुंदर असलेला समुद्र किनारा विस्तीर्ण आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या मुख्य चौकात दुर्गादेवीचे मंदिर आहे. १८व्या शतकात एका सिद्ध पुरुषाने हे गाव वसवले असल्याची माहिती स्थानिक देतात. भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे यांचे मुरुड हे जन्मगाव. दुर्गादेवी मंदिराजवळ असलेल्या शाळेच्या प्रांगणात महर्षी कर्वे यांचा अर्धपुतळा आहे.
2011 साली आम्ही चित्रीकरणासाठी ज्यावेळी या गावात गेलो त्यावेळेस दुर्गादेवी मंदिराचे विश्वस्त श्री अनंत खोत आणि दातार गुरुजी यांनी आम्हाला या परिसराची माहिती दिली.
कसं आहे हे मुरुड गाव आणि दुर्गादेवी मंदिर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा
श्री दुर्गादेवी मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. सभागृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस श्रीमंत चिमाजी अप्पांनी दिलेली पोर्तुगीज कालीन भव्य घंटा आहे. दोन सभागृह, आतील सभागृहात सुंदर रंगांची कलाकुसर आणि बारीक नक्षीकाम असलेले २८ लाकडी खांब आहेत. गाभाऱ्यात दुर्गादेवीची अंदाजे ३-४ फुट उंचीची काळ्या पाषाणातील स्वयंभूमूर्ती आहे. मंदिरात मराठी भाषेत लिहिलेला एक शिलालेख बघायला मिळतो. एका आख्यायिकेनुसार राक्षसांशी झालेल्या युद्ध प्रसंगी देवीच्या हातातून शस्त्र खाली पडले म्हणून माडाच्या पातीने लढतांना देवीची मान थोडी तिरपी झाली होती, म्हणून दुर्गादेवीच्या मूर्तीची मान तिरपी असल्याचे दिसून येते. दुर्गा देवी मंदिर परिसरात देवीचे मूळ स्थान म्हणून ओळखले जाणारे स्वयंभुआ देवीचे छोटेसे मंदिर आहे. स्वयंभुआ देवीची शिळा ही तिरपीच आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी दुर्गादेवी मंदिर परिसरात भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे. मुरुड परिसरात अनेक हॉटेल्स, बीच रिसॉर्टस, घरगुती निवास, आणि भोजनगृह आहेत. आपल्या बजेटनुसार आपण निवड करू शकतो.
इथले निसर्गरम्य वातावरण, आल्हाददायक हवामान आणि इथला कोकणमेवा पुन्हा पुन्हा पर्यटकांना आपल्या भेटीला बोलवत असतो.
पावसाळा वगळता स्थानिक कोळी लोकांच्या बोटीतून डॉल्फिन बघण्यासाठी जाता येते.
महर्षी कर्वे यांच्याशिवाय साने गुरुजी (पालगड), लोकमान्य टिळक (चिखलगाव) आणि भारतरत्न पी. वी. काणे यांचा जन्सुद्धा दापोलीचाच.
अश्या निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या दापोलीला भेट अवश्य दिली पाहिजे.

