रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय निसर्गरम्य गाव म्हणजेच गुहागर (Guhagar). नारळी-पोफळीची (Coconut/Betalnut) हिरवी किनार लाभलेला येथील समुद्र किनारा आबालवृद्धांचे आकर्षण ठरत आहे . भौगोलिकदृष्ट्या गुहागर हे गाव खालचा पाट, दुर्गादेवी मंदिर (Durgadevi temple Guhagar) असलेला भाग म्हणजे वरचा पाट आणि गावाच्या अगदी मधोमध व्याडेश्वराचे (Vyadeshwar) पुरातन मंदिर स्थित असलेला देव पाट अशा तीन भागात विभागले गेले आहे . खालच्या पाटातील रस्त्याने कोळी वाडा पार करून आपण थेट असगोली गावात असलेल्या वालुकेश्वर (Valukeshwar) मंदिरापर्यंत आपण पोहचू शकतो .
समुद्र किनारी नारळी पोफळीच्या बागे शेजारीच असलेले छोटेसे मंदिर लक्ष वेधून घेते. व्याडेश्वर माहात्म्य नावाच्या पोथीत तसेच पुराणातील संह्याद्री खंडात वालुकेश्वर मंदिरापर्यंत गुहागरची हद्द होती असा उल्लेख आढळतो . त्यावरून हे स्थान प्राचीन असल्याचा निष्कर्ष निघतो. फार पूर्वी गुहागर स्थित श्री व्याडेश्वराच्या पिंडीचे तीन कपचे उडाले होते. त्यातील एका कपचा वालुकेश्वर येथे पडून शिवपिंडी निर्माण झाली असल्याने हे स्थान व्याडेश्वराचाच अंश भाग असल्याची भाविकांनी श्रद्धा आहे.
वालुकेश्वर मंदिराला जांभ्या दगडाची तटबंदी आहे . एका मोठ्या कमानीखालून आपण मंदिर परिसरात प्रवेश करू शकतो . समोरच एक भव्य दीपमाळ आणि तुळशी वृंदावन दृष्टीस पडते. सभामंडप आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे . सभागृहात प्रवेश केल्यावर समोरच मोठ्या नंदीचे शिल्प नजरेस पडते. तीन साडेतीन फूट खोल असलेल्या गाभाऱ्यात तीन फूट लांबीची शाळीग्राम शिळेतील भव्य शिवपिंडी आहे . पिंडीमागे एका कोनाड्यात दुर्गादेवीची लहानशी मूर्ती आणि हातात जपमाळ घेतलेल्या गणपतीची मूर्ती स्थित आहे. महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, त्रिपुरी पौर्णिमेला अनेक भाविक इथे दरवर्षी दर्शनासाठी येत असतात .
मंदिराच्या मागे समुद्रकिनाऱ्याला लागूनच गोड्यापाण्याचे एक पुरातन तळे आहे. १७५३ साली वैजनाथभट शारंगपाणी (खरे). नावाच्या भक्ताने मंदिराजवळचे तळे, विहीर आणि धर्मशाळा बांधली असल्याची माहिती गावकरी सांगतात. असगोली परिसरात पंधरा / सोळाव्या शतकात अस्तित्वात असलेल्या सागरी माहामार्गाच्या अनेक खुणा इतिहासकारांनी केलेल्या संशोधनात आढळून आल्या आहेत. मंदिर आवारातील मोठ्या वृक्षाला बांधलेला पार , मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गोड्यापाण्याच्या तळ्यावरून हा परिसर प्राचीन सागरी महामार्गावरील थांबा असल्याची खूण पटते.
असगोली येथील सागरकिनाऱ्यावर संध्याकाळी भरसमुद्रातुन मासेमारी करून परत किनाऱ्यावर बोटी घेऊन येणारे कोळी बांधव आणि विविध प्रकारचे ताजे मासे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. असगोली येथून फक्त अडीच किलोमीटर अंतरावर गुहागर गाव असून येथे निवास/भोजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. असगोली गावात हि निवास आणि भोजनाची सोय होऊ शकते. गुहागरला आल्यावर असगोली येथील श्री देव वालुकेश्वर मंदिरास अवश्य भेट द्यावी…….
Mahaparyatan.com

