एका निसर्गनिर्मित गुहेत असलेले भगवान शंकराचे जागृत देवस्थान – श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र, मारळ, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी
कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत अत्यंत घनदाट आणि निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या श्री क्षेत्र मार्लेश्वर या सुप्रसिद्ध देवस्थानाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
श्री क्षेत्र मार्लेश्वर…. हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावाजवळ वसलेले आहे. इथे एका निसर्गनिर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर हे नाव पडले असावे.
येथे कसे जायचे l
मार्लेश्वरला जाण्यासाठी एस.टी. बसेसची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाट, कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे मार्लेश्वर सुमारे २० किमी अंतरावर आहे. तर रत्नागिरीहून अथवा मुंबईहून येताना देवरूखहून हातीव मार्गे सुमारे १८ किमी अंतरावर मारळ हे गाव आहे. उंच डोंगरावर असलेले हे स्थान हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते आणि तेथून एक किलोमीटरचा चढ असून साधारणपणे साडेपाचशे पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. स्वयंभू शिवपिंडी असलेल्या गुहेपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत.
मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे. या मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच छोटीशी देवळी आहे . या देवळीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात अशी प्रथा आहे. गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा दोन स्वयंभू शिवपिंडीचे भाविकांना दर्शन होते . मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून, मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समई आणि निरांजनांचा मंद उजेड असतो. विशेष म्हणजे या गुहेत इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई आहे.
शिवपिंडीजवळ असतो नाग सर्पांचा वावर l शिवपिंडीच्या मागे कपारींमध्ये असंख्य सापांचे अस्तित्व असते, मात्र या सर्पांचा कोणालाही उपद्रव झाल्याचे ऐकिवात नाही. भगवान शंकराचे अंगावर नाग-सर्प का असतात याची प्रचिती मार्लेश्वराच्या ठिकाणी आपल्याला नक्कीच येते.
वार्षिक सण उत्सव l मार्लेश्वरचे दर्शन घेण्यासाठी याठिकाणी भाविकांची वर्षभर रिघ लागलेली असते. दर सोमवार/शनिवारी , श्रावण महिना, महाशिवरात्री, दत्तजयंती या दिवशी येथे भाविकांचा महासागर लोटतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी भरणारी यात्रा हि या देवस्थानाचा प्रमुख उत्सव मानला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि आई पार्वतीचा लग्न सोहळा थाटात पार पाडला जातो. ‘श्री मार्लेश्वर’ हा वर तर ‘गिरजाई’ देवीस वधू समजून लग्न लावले जाते. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वर येथे येते. हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावला जातो. मकरसंक्रांत यात्रोत्सवाला अंदाजे दोन लाख भाविक दरवर्षी हजेरी लावतात.
पर्यटकांचे विशेष आवडीचे ठिकाण धारेश्वर धबधबा………… मार्लेश्वर गुहेपासून धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही पायऱ्या उतरून गेल्यावर उजव्या हाताला श्री वेताळाचे छोटेसे देऊळ आहे. तीनही बाजूने उंच डोंगरांनी वेढलेल्या या स्थानाचे आकर्षण म्हणजे २०० फूट उंचीवरून पडणारा ‘धारेश्वर’ धबधबा. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते. पावसाळ्यात आजूबाजूला अनेक छोटे छोटे धबधबे कोसळत असल्याचे मनोहारी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडेकपारीतून पाहायला मिळते. शुभ्र पाण्याचा प्रपात बघितला की असे वाटते जणू शंकराच्या जटेतून गंगाच कोसळत आहे. भर पावसाळ्यात मात्र या धबधब्याचं रूपं हे धडकी भरवणारं असतं. तेथे जवळ जवळ बाराही महिने पाणी असते. श्रावणात या हिरव्यागार डोंगरातून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक येथे येत असतात. मार्लेश्वरला गेल्यानंतर येथील धबधब्याचे दुरूनच दर्शन घेणे योग्य असून जवळ जाणे धोकादायक असल्याने पर्यटकांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. निसर्गरम्य परिसर, समोरचा कोसळणारा जलप्रपात, आसपासची वनराई आणि गूढ शांतता यांनी वेढलेला मार्लेश्वर परिसर, मनात खूप काळ रेंगाळत राहातो.
मंदिरात होणारे धार्मिक कार्य, अभिषेक तसेच देणगीसाठी श्री देव मार्लेश्वर देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन