कोकणातील त्यांचे गाव, घर, वाडी, मंदिर पाहून तुम्हाला त्यांच्या काळात गेल्याचा येईल अनुभव….
चिखलगाव – लोकमान्य टिळक मंदिर, श्री लक्ष्मीकेशव मंदिर माहिती
स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ! अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज जन्मदिवस. स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या जहाल शब्दांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या लोकमान्य टिळकांबद्दल आज आपण त्यांचा महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा त्यांचे घर, त्यांच्या वाडीची माहिती घेणार आहोत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव होय. निसर्गाच्या सानिध्यात असलेले दापोली तालुक्यातील एक गाव म्हणजे चिखलगाव होय. लोकमान्य यांच्या वडिलोपार्जित घराला शासनाने ऐतिहासिक वास्तूचा दर्जा दिला आहे.
येथे कसे जायचे – दापोली-दाभोळ रस्त्यावर दापोलीपासून 16 कि. मी. अंतरावर उजव्या बाजूला चिखलगाव फाटा आहे. चिखलगाव हे फाट्यापासून 1 कि. मी. आत आहे.
दापोली येथून तुम्ही खाजगी वाहनाने, एस.टी.ने या ठिकाणी जाऊ शकतात. गावात टिळकवाडी येथे लो. टिळकांच्या मूळ घराच्या जोत्यावर टिळक मंदिराची देखणी वास्तू उभी आहे. त्यामध्ये त्यांचा अर्धपुतळा स्थापन केला आहे.
टिळक मंडळींचे कुलदैवत असलेले श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर गावाच्या जवळच आहे. मंदिराला घुमटाकार कळस असून त्याच्या अग्रभागी कमळ आहे. सभागूहाची मात्र पडझड झालेली आहे. मूर्तीजवळ पुरातन पद्धतीची दगडी समई असून देवळासमोर दीपमाळ आहे. सुमारे सव्वादोन फूट उंचीच्या या मूर्तीवल सुरेख अलंकार कोरलेले आहेत. पायांत तोडे, गळ्यात कौस्तुभमाला, छातीवर पादचिन्ह आणि करंडक मुकुट ही वैशिष्ट्य विष्णूचीच आहेत असे मानतात.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर आणि डॉ. रेणू दांडेकर यांनी येथे स्थानिक तसेच आसपासच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून एक मोठे शैक्षणिक संकुल उभारले आहे. या लो. टिळक हायस्कूलमध्ये तांत्रिक शिक्षण देणारे कोर्सेस, मुला-मुलींसाठी वसतिगृहे, ग्रंथालय, संस्कार केंद्रे, आरोग्य सेवा असे अनेक प्रकल्प येथे राबविले जातात.
आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून आणि इतरही अनेक ग्रामीण भागांतील मुलं-मुली येथे दाखल होऊन आपली प्रगती साधत आहेत. प्रसिद्ध ब्रिटीश वास्तुरचनाकार लॉरी बेकर यांच्या संकल्पेतून साकार झालेले टिळक मंदिर आणि संस्थेचे वसतिगृह, त्यांचे कौलारू छत वैशिष्ट्यपूर्ण आहे.