।। श्रीराम समर्थ ।।रामनवमी – २०२४ ” जागोजागी राम मंदिर स्थापियले भूमंडळी रामनाम गर्जविले. “श्री महाराजांनी इ.स. १८९१ साली स्वतःच्या राहत्या वाड्यात थोरले राममंदिर उभारले. भक्तांचा ओघ सतत वाढत राहिल्याने ते मंदिर अपुरे पडू लागले. म्हणून श्री महाराजांनी इ.स. १८९४ साली या ठिकाणी नवीन राममंदिर बांधले. त्यालाच सर्वजण धाकटे राममंदिर म्हणू लागले.या ठिकाणी सध्याचे ओंकारेश्वर हे स्वयंभू श्री शिवलिंग व त्याभोवती अकरा ज्योतिर्लिंगे असे शंकराचे मंदिर होते. तेथे श्री महाराजांनी दगडी शिवमंदिर बांधले.जेथे ” हर तेथे हरी” या त्यांच्या प्रघातानुसार श्री महाराजांनी शिवमंदिरा जवळच हे धाकटे राममंदिर बांधले. काशीच्या त्यांच्या एका भक्ताने श्रद्धापूर्वक दिलेल्या श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीची त्यांनी येथे प्रतिष्ठापना केली.सिंहासनावर श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई यांच्या उभ्या मूर्ती आहेत. मूर्तीवर लाकडी मेघडंबरी आहे. श्रीरामा समोरील भिंतीपासून २ फुटांवर सिंहासन आहे. त्यावर श्री हनुमानाची मूर्ती स्थापन केली आहे.श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण व हनुमान यांच्या अत्यंत सुबक, सुंदर व सुहास्य वदनाच्या मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.इ.स.१८९४ पासून म्हणजेच या मंदिराची स्थापना झाल्यानंतर गुरुपौर्णिमेची “गुरुपूजा” या मंदिरातच संपन्न होत असे. श्री महाराज ज्या खुर्चीवर बसून ही पूजा स्विकारीत असत, ती खुर्ची या सभामंडपात ठेवली आहे व त्यावर श्री महाराजांची तसबीर ठेवली आहे. गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचे वेळी गोमाता पूजन सुद्धा होत असे.या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी श्री महाराजांनी गायत्री पुरश्चरण आणि रुद्रस्वाहाकार करविला. आठ दिवस गावजेवण चालले होते.या मंदिरातच श्री महाराजांनी श्री तात्यासाहेब केतकरांना (ते वाणीरुपातील महाराज म्हणून पुढे सुपरिचित झाले) अनुग्रह दिला.श्री महाराजांचे एक शिष्योत्तम पांडुरंगबुवा ऊर्फ रामानंद महाराज यांचा विवाह श्री महाराजांच्या उपस्थितीत जालन्याच्या आनंदसागर महाराजांच्या कृष्णा नामक सुकन्येशी या मंदिरातच संपन्न झाला.इ.स.२००२ मध्ये या मंदिराचा जीणोद्धार करण्यात आला. या मंदिराच्या आवारात श्री महाराजांनी इ.स.१९११ साली एकमुखी श्री दत्त मूर्ती आणि श्री नृसिंह मूर्ती यांची स्थापना केली. इ.स.१९१२ साली त्यांनी शनिदेवाची मूर्ती स्थापन केली.या मंदिरांमध्ये श्री रामनवमी, श्री हनुमान जयंती व श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.।। श्री राम जय राम जय जय राम ।।