उंच टेकडीवर असल्याने येथून समुद्राचे विहंगमदृश्य दिसते
कोकणातल्या देवस्थानांचं वैशिष्ट्य कोणतं तर त्या देवस्थानांना लाभलेली निसर्गाची सुरेख पार्श्वभूमी आणि आगळावेगळा इतिहास, प्राचीन संस्कृतीशी नाळ सांगणारी आणि वेगवेगळ्या कालखंडात बांधली गेलेली इथली सुरेख मंदिर म्हणजे कोकणचा अमूल्य ठेवा आहे.
प्रत्येक मंदिराची बांधणी वेगळी, कथा वेगळी आणि निसर्गाचा चमत्कारही वेगळा. कुठे दूर उंच डोंगराच्या टोकाशी तर कुठे उसळणाच्या समुद्राच्या काठावर तर कुठे भुयारात गुप्त जागी, अशी ही देवस्थानं आवर्जून पाहण्याजोगी आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही काही पाहण्याजोगी सुंदर देवस्थाने
कड्यावरचा गणपती हे एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे जे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर समुद्र किनाऱ्यापासुन जवळ आहे आणि त्याला कड्यावरचा गणपती म्हणून ओळखले जाते.
आंजर्ले गावात समुद्रासमोरच असलेल्या एका उंच टेकडीवर हे गणेश मंदिर असून मंदिराच बांधकाम माधवराव पेशवे यांच्या काळातलं असावं असं सांगितलं जातं.
पूर्वी आंजर्ले येथेच समुद्रकाठी असणारी आंजर्लेश्वर व गणपती अशी दोन मंदिरं समुद्रात बुडाली. त्यातील गणपतीचं मंदिर पुन्हा इथे या उंच जागी कड्यावर बांधलं गेलं असं जुने जाणकार सांगतात.
सध्याचं मंदिर हे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असून हल्ली टेकडी चढून जायला त्रास नको म्हणून उत्तम गाडीरस्ताही झालाय. परंतु टेकडी चढून जाऊन (२५० पायऱ्या) मंदिर पाहाणं यातील आनंद अवर्णनीय असा आहे.
हे ठिकाण दापोलीपासून केवळ २४ किलोमीटर अंतरावर असून दापोलीतून बस-रिक्षा सेवा आहे. निवास व्यवस्था मुरूड, हर्णे अथवा आंजर्ले या गावी. (भक्तनिवास फोन: ०२३५८-२३४३००).
